








M287 Prem-murti Swami Bhaskareshwarananda (प्रेममूर्ती स्वामी भास्करेश्वरानंद)
“महापुरुष महाराज म्हणजेच स्वामी शिवानंद महाशिवरात्रीला भुवनेश्वर येथील रामकृष्ण मठात आले होते. ते चार ब्रह्मचाऱ्यांना महाशिवरात्रीला संन्यासदीक्षा देणार होते. शिवरात्रीच्या चौथ्या प्रहराला ते चौघे श्रीरामकृष्णांना प्रणाम करून आले. श्रीरामकृष्ण-होमाग्नीमध्ये सर्वांनी आहुती दिल्या. महापुरुष महाराजांनी त्यांना मंत्र देऊन संन्याशाची भगवी वस्त्रे दिली. त्यानंतर महापुरुष महाराजांनी भुवनेश्वरच्या चार सुविख्यात शिवरूपांची नावे एका कागदावर लिहून विप्रदास या ब्रह्मचाऱ्याला दाखवली. त्या चार नावांपैकी विप्रदासला संन्यासाश्रमातले कोणते नाव हवे ते विचारले. त्यावर विप्रदास म्हणाला, ‘‘महाराज, इतर तिघांना त्यांची नावे निवडू द्या. जे नाव उरेल ते माझे!’’ विप्रदासाचे उत्तर ऐकून महापुरुष महाराज अत्यंत प्रसन्न झाले. त्यांना वाटले, ‘हा खरा संन्यासी! याला संन्यासाश्रमातील नावाविषयीही आवडनिवड नाही! आणि स्वत:च्या आधी इतरांचा विचार करणे हा तर याचा स्वभावच दिसतो!’ इतर तीन ब्रह्मचाऱ्यांनी आपापली नावे निवडली. मग शेवटचे नाव उरले ते ‘भास्करेश्वरानंद’! हे नाव लांबलचक असल्याने कोणीच निवडले नव्हते.”
“ज्याने ते निवडले त्याने ते नाव सार्थ केले. भास्करासारख्या तेजस्वितेने तो जगाला प्रकाश देता झाला. सप्टेंबर १९२८ मध्ये विप्रदास म्हणजे भास्करेश्वरानंद महाराज नागपूरला आले आणि आपल्या नि:स्वार्थ सेवेने त्यांनी विदर्भातले लोकमानस जिंकून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ब्रह्मचाऱ्यांची आणि साधक परिवारांची जीवने ईश्वरपरायण आणि सेवापरायण झाली.”
“श्रीरामकृष्ण आणि माताजी श्रीसारदादेवी यांच्या जीवनविचाराचा परिमळ नागपूरमध्ये दरवळू लागला. उत्तमोत्तम प्रकाशने, वैद्यकीय सेवा केंद्र, विद्यार्थिनिवास अशा अनेक अंगांनी तेथील कार्य बहरत राहिले. या आश्रमाने अनेक विद्वान, तपस्वी, कर्तृत्वसंपन्न आणि समर्पित संन्यासी दिले. स्वामी भास्करेश्वरानंदांनी स्वतः निर्विकल्प समाधीची अनुभूती घेतलेली असली तरी उज्ज्वल कर्मयोगाचा आदर्श ते जगले.”
General
- AuthorSwami Mokshananda