










M273 Bharatiya Itihasache Padarav (भारतीय इतिहासाचे पदरव)
Non-returnable
Rs.108.00 Rs.120.00
Tags:
Product Details
Specifications
प्रस्तुत पुस्तकात भगिनी निवेदितांनी भारताच्या प्राचीन उज्ज्वल इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा पद्धतशीर आणि अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मागोवा घेतलेला आहे. या मागील त्यांची कृतज्ञता आणि विनय “ज्याप्रमाणे पट्टीच्या पोहणाऱ्याला भर प्रवाहात उडी घेण्याचा आनंद कसा असतो ते माहीत असते, त्याचप्रमाणे अशा तऱ्हेची मानसिकता असणाऱ्या संशोधकांना वाटते की इतिहास लेखनासाठी त्यांच्याकडे अफाट साहित्य आहे, आणि हे काम जणू आपल्यासाठीच ठेवले गेले आहे असे मानून ते खरोखरी स्वतःस धन्य मानतात” अशा शब्दांत व्यक्त झालेला आहे.
निवेदिता हे जाणून होत्या की भारताच्या इतिहासाच्या प्रकाशातच भारताच्या समस्या जाणणे शक्य आहे. समग्र भारत, त्याच्या विविध अंगोपांगांसह एक दिव्यगूढ विलक्षण लेणे घेऊन त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. या लोकोत्तर देशाची उत्पत्ती, जडणघडण व त्याचे अंतःप्रवाह या साऱ्याने निवेदिता मुग्ध झाल्या होत्या. स्वामी विवेकानंदांसमवेत त्यांनी उत्तर आणि वायव्य भारतातील अनेक तीर्थस्थानांना भेटी दिल्या तसेच अनेक प्रांतांतून भ्रमंतीही केली होती. तसेच स्वामीजींनी जेव्हा अमेरिकादी पाश्चात्त्य देशांचा दुसऱ्यांदा दौरा केला तेव्हा निवेदिताही त्यांच्या समवेत होत्या. त्यामुळे देशोदेशींचे जनमानस व तेथील सामाजिक-सांस्कृतिक वीण न्याहाळण्याची एक अधिक डोळस जाण त्यांना लाभली व स्वामी “विवेकानंदांसारख्या विभूतीचा घनिष्ठ संग लाभल्याने या विषयाकडे पाहण्याला एक रसरशीत दार्शनिक अधिष्ठान लाभले.
हा भारत देश कसा अस्तित्वात आला, हा देश वास्तवात काय आहे, त्याच्या उत्क्रांतीमागील हेतू काय असला पाहिजे आणि त्याच्यातील सुप्त क्षमता कोणत्या असू शकतील या साऱ्याचा अचूक वेध घेण्याचा निवेदितांनी जो भीमप्रयत्न केला आहे त्याचा प्रत्यय आपल्याला या पुस्तकात ठायी ठायी येतो. निवेदितांची तीक्ष्ण निरीक्षण शक्ती, देशोदेशीच्या इतिहासांचा त्यांचा व्यासंग आणि मुळात उदात्त मानवी आशा-आकांक्षांचे त्यांना असलेले तरल भान हे सारे या पुस्तकाच्या मनोज्ञ वाचनातून आपल्याला जाणवल्याखेरीज राहत नाही.
ठिकठिकाणच्या चालीरीती, सणवार यांचा अभ्यासपूर्ण रीतीने मागोवा घेत भारताच्या समृद्ध संस्कृतीचे एक लोभस दर्शन निवेदिता आपल्याला घडवतात. भारताच्या सांस्कृतिक एकसंधतेच्या त्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी स्वतःत जोपासलेली ही इतिहास संशोधनाची पद्धतदेखील विद्वान व सुविद्य वाचकांना खचितच जाणवेल. भारताच्या समाज व संस्कृतीबरोबरची येथील चित्रकला, शिल्पकलादी विविध ललितकलांबद्दलची निवेदितांची सुजाण व पारखी जाण आणि निरीक्षणे अतिशय काव्यात्म शब्दांत ठिकठिकाणी प्रकट होतात. अर्थात, आपल्याला हेही विसरता कामा नये की, निवेदितांचे काही निष्कर्ष पुरातत्त्व विभागाच्या तत्कालीन ज्ञानसाठ्यावर अवलंबून होते. हडप्पा आणि मोहंजोदाडो येथील उत्खनने भगिनी निवेदितांच्या निधनानंतर दशकाभरानंतरची आहेत. या उत्खननांच्या संशोधनाने कदाचित निवेदितांच्या स्वतःच्या काही निष्कर्षांना वेगळे वळण लागले असते हे अभ्यासू वाचकांच्या ध्यानी येईलच.
भगिनी निवेदितांनी राजगीर, तक्षशिला आदी विविध भारतीय नगरींचा घेतलेला वेध, बौद्धकालीन काळाचा त्यांनी आपल्या “बुद्धीने घेतलेला धांडोळा आणि मानवी जीवनाच्या उदात्त गंतव्याकडे दर्शविलेला त्याचा रोख हे मुळात वाचण्यासारखे आहे. या पुस्तकाच्या रूपाने रामकृष्ण-विवेकानंद साहित्यात एक अनुपम भर पडलेली आहे. आम्ही वाचकांना विनंती करतो की त्यांनी धीरपूर्वक या पुस्तकाचे वाचन करावे. त्यातून प्राप्त होणाऱ्या नव्या अंतर्दृष्टीने वाचकांचे जीवन अधिक समृद्ध होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
General
- AuthorBhagini Nivedita
- TranslatorSuhasini Deshpande