









M130 Amrit Vani (अमृतवाणी : रामकृष्ण-उपदेश-संग्रह)
Non-returnable
Rs.80.00 Rs.100.00
Tags:
Product Details
Specifications
हे पुस्तक म्हणजे, श्रीरामकृष्ण मठ, मद्रास यांनी प्रकाशित केलेल्या ‘Sayings of Shri Ramakrishna’ या इंग्रजी पुस्तकाचा व ‘अमृतवाणी’ या नावाने आम्ही प्रकाशित केलेल्या हिन्दी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. परंतु हा शब्दानुवाद नसून भावानुवाद आहे. वाचकांना या ग्रंथाचा आनंद अधिक चांगल्या रीतीने उपभोगता यावा या दृष्टीने प्रारंभी श्रीरामकृष्णदेवांचे संक्षिप्त चरित्र देण्यात आले आहे. धर्मभूमी भारताच्या आध्यात्मिक इतिहासाचे अवलोकन केले असता, एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते. जेव्हा जेव्हा भारताच्या आध्यात्मिक जीवनावर जडवादाचे संकट कोसळले, तेव्हा तेव्हा भगवंतांनी अवतार धारण करून भारताला उद्धरले आहे. प्राचीन काळी युगायुगात संकटे आली पण वर्तमान युगातील हे संकट फार भयंकर होते. कारण यावेळी नुसता भोगवादच बोकाळला नाही, तर यावेळी भोगवादाला आधार जडवादाचा आणि त्याला आधार भौतिक विज्ञानाचा लाभला. अशी ही कठीण शृंखलाच तयार झाली. या तिन्ही गोष्टींनी स्त्रीपुरुषांना अतिशय आकर्षित केले. या तीन्ही गोष्टींनी तीक्ष्ण तर्काच्या साहाय्याने लोकांच्या हृदयांना छेदून आपले ठाण मांडले. तेथील श्रद्धा आणि विश्वास या मूलनिवासियांना पार हुसकून लावण्याचा त्यांनी जणुकाही विडाच उचलला. त्यांच्या मोहक स्वरूपांवर आमचे भारतवासी जन इतके भाळले, की आपला त्यागाधिष्ठित सनातन धर्ममार्ग सोडून ते वाटेल तिकडे भरकटू लागले. मानव-समाजावर ओढवलेल्या या महान संकटाचा परिहार करण्यासाठी सनातन धर्माला पुन्हा सुप्रतिष्ठित करणे अत्यावश्यक होते. परंतु यावेळी हे कार्य फार कौशल्याने साधणार होते. पूर्वीप्रमाणे नुसता राक्षससंहार करून चालणार नव्हते. ज्यांना विज्ञानाने झपाटले आहे, त्यांनाही सहज पटेल, आवडेल व समजेल, अशा पद्धतीने यावेळी धर्मसंस्थापना करायची होती. ह्या कार्याच्या पूर्ततेसाठीच भगवान श्रीरामकृष्णदेव अवनीतलावर अवतरले. त्यांनी आपल्या दिव्य जीवनाच्या प्रभावाने भारताच्या सुप्त आध्यात्मिक शक्तीला पुन्हा जागृत केले. केवळ हिंदू धर्माचेच नव्हे तर जगातील प्रायः सर्वच प्रमुख धर्मांचे त्यांनी पुनरुज्जीवन केले. त्यांनी सगळ्या जगातील धर्मग्लानी नाहीशी केली. भ्रान्ती, अशान्ती आणि अतृप्तीने ग्रासलेल्या जगाला त्यांनी अमृताचा ठेवा प्रदान केला. मानवी जीवनाचे खरे सार्थक कशात आहे हे त्यांनी जगाला शिकवले. भगवान श्रीरामकृष्णांच्या रूपाने जणुकाही सगळेच धर्म मूर्तिमंत साकारले होते. त्यांच्या ठायी सनातन सत्याची अभिनव अभिव्यक्ती झाली होती. त्यांची उपदेश देण्याची पद्धती जितकी साधी सोपी आणि सरळ होती, तितकीच ती चेतोहर होती. त्यांच्या वाणीच्या मागे गहन गंभीर आध्यात्मिक अनुभूती उभी होती. म्हणूनच श्रोत्यांच्या मनावर त्यांच्या बोलण्याचा विलक्षण प्रभाव पडत असे. त्यांचा उपदेश ऐकताक्षणीच श्रोत्यांच्या मनातील संशय-पटले नाहीशी होत असत, द्वंद्वे संपत असत आणि अविश्वास व अश्रद्धा यांची जागा विश्वास आणि श्रद्धा घेत असत. अशा रीतीने आपल्या अलौकिक उपदेशांच्याद्वारे त्यांनी असंख्य स्त्रीपुरुषांना दिव्य जीवनाचा मार्ग दाखविला.
General
- AuthorCompilation
- TranslatorP. G. Sahastrabuddhe