
















M011A Sri Ramakrishna Vachanamrita - Marathi ( श्रीरामकृष्ण वचनामृत ) - Set of 2 Books
स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत ग्रंथाविषयी श्री. महेंद्रनाथांना लिहिले होते की, ‘‘हे उपदेशामृत समस्त जगतावर शांतीचा वर्षाव करणार आहे. हे महत्कार्य विधात्याने तुमच्यासाठीच राखून ठेवले होते.’’ स्वामी विवेकानंदांची भविष्यवाणी अक्षरश: खरी ठरली. जगातील प्राय: सर्वच मुख्य मुख्य भाषांतून ‘कथामृता’चा अनुवाद होऊन गेला आहे. आणि सर्वत्र त्याचे निरपवाद प्रेमाने स्वागत झाले असून, विद्वान-अविद्वान, धनी-निर्धन, अगणित नरनारींच्या हृदयांना त्याने परम शांती प्रदान केली आहे. स्वदेशातील लहानथोर असंख्य व्यक्तींवरील त्याच्या सखोल प्रभावाची गोष्ट बाजूलाच ठेवू, पण रोमां रोलां, आल्ड्स हक्स्ले प्रभृतींसारख्या कितीतरी विदेशी मनीषा व्यक्तींना देखील भगवान श्रीरामकृष्णदेवांच्या जीवन-मंदिरात धर्माच्या यथार्थ स्वरूपाचे, सार्वजनीन भावाचे व अदृष्टपूर्व समन्वयाचे दर्शन घडून, त्या सर्वांनी आपले श्रद्धामय अर्घ्य या युगपुरुषाच्या चरणी समर्पण केले आहेत. खरोखरच, श्रीरामकृष्णांची जीवन-लीला अत्यंत अद्भुत, रम्य आणि पावन आहे. भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरीलही सर्व प्रमुख धर्माची आणि विभिन्न संप्रदायांची प्रत्यक्ष अनुष्ठानपूर्वक साधना करून त्यांनी ‘जितकी मते तितके मार्ग’ असा संदेश जगाला दिला. ‘वचनामृत’ वाचताना वाचकांना आढळून येईलच की कितीतरी वेळा श्रीरामकृष्ण बोलता बोलता प्रगाढ समाधीत मग्न होत व मग किंचित भान परतल्यावर त्या अर्धबाह्य-दशेतून आध्यात्मिक जीवनातील गूढ रहस्ये उकलून सांगत; आणि म्हणूनच सर्व देशांतील, सर्व स्थितींतील आणि सर्व धर्मांतील लोकांवर त्यांच्या वाणीचा विलक्षण प्रभाव पडलेला दिसून येतो. भगवद्गीतेसंबंधी वा उपनिषदासंबंधी देखील आपल्याला असाच अनुभव येतो.
General
- AuthorSri Mahendranath Gupta
- TranslatorSwami Shivatattwananda